आणि.. तपपूर्ती चिन्हांचे विजेते आहेत,
चिंतन क्लासेस, कल्याण.
१२ व्या वेधच्या शेवटच्या सत्राची
सुरुवात या वाक्याने झाली. जोरदार
टाळ्यांच्या गजरात व्यासपीठावर जाताना
मन आनंदाने ओथंबून गेले होते. हे यश
होते. विद्यार्थी, सहकारी शिक्षक, पालक
सगळ्यांनीच हा क्षण मनात साठवून ठेवला
आहे. आजही अनेक अडचणींच्या क्षणी ते
सन्मान चिन्ह मला सन्मानाने विचार
करण्याची प्रेरणा देते.
" vocational education direction &
harmony " म्हणजेच vedh हा
व्यक्तिमत्व विकासासाठीचा एक छोटासा
भाग आहे. सर्वात प्रथम 'वेध' बद्दलची
माहिती वर्तमानपत्रात वाचली आणि
त्यांनी मांडलेली कार्यक्रमाची
संकल्पना खूपच आवडली. डिसेंबर २०००
मध्ये प्रथम मी, माझ्या सहकारी
शिक्षिका सौ. लिमये मॅडम व माझी आई
सारे तिघेच कार्यक्रमाला हजर राहिलो.
कार्यक्रमाचे स्वरूप, कार्यक्रमाला
आलेली विविध व्यक्तिमत्व आणि डॉ. आनंद
नाडकर्णीनी त्यांच्याशी साधलेला संवाद
हे सर्व पाहून आम्ही इतके भारावून गेलो
होतो होतो कि त्याच क्षणी मनाशी पक्के
ठरवून टाकले कि या कार्यक्रमाचा आनंद
आपल्यापुरता मर्यादित न ठेवता तो
जास्ती जास्त विद्यार्थ्यांपर्यंत
पोहोचवायचा आणि २००१ पासून चिंतन
क्लासचे विद्यार्थी, शिक्षक, आणि
उत्साही पालक मोठ्या संख्येने ठाण्याला
कार्यक्रमात सहभागी व्हायला लागले आणि
आजही अनेक आजी-माजी विद्यार्थी,
शिक्षक आणि अनेक पालक सातत्याने १३
वर्ष या वेधलं हजेरी लावतात.
पाठ्यपुस्तकातील धडे शिकणारी मुले
ज्यांचे जीवनचरित्र म्हणजेच एक धडा
असतो, अशा व्यक्तींना जेंव्हा समोर
बघतात, ऐकतात तेंव्हा त्यांना मिळणारा
आनंद, ज्ञान, प्रेरणा सर्वच अवर्णनीय
असते. वेधच्या प्रवासात अशी कित्येक
व्यक्तिमत्व भेटतात ज्यांच्या एक दीड
तासाच्या चर्चेतून आयुष्यभराची पुंजी
जगायला उपयुक्त ठरते. 'वेध' बद्दल
जेंव्हा व्यक्तिशः मी विचार करतो
तेंव्हा एक शिक्षक, पालक, व शेवटी एक
माणूस म्हणून निश्चितच प्रत्येक वर्षी
आपले अनुभवविश्व समृद्ध होत आहे,
विचारांना योग्य दिशा मिळते, प्रगल्भता
वाढत आहे. आणि विद्यार्थ्यांबरोबर
आपणही घडत आहोत हे जाणवते. 'वेध'ने
आजपर्यंत आम्हाला काय दिले हे अगदी
थोडक्यात सांगायचं तर अनेक अश्या
वैचारिक व्यक्तींचा सहवास 'वेध'नि
आम्हाला दिला, ज्यांची वैचारिक,
बौद्धिक प्रगल्भता थक्क करणारी आहे,
सामाजिक जाणीव, व समाजाला त्यांचं देणं
नतमस्तक करणार आहे, हा गाव, हा देश
नव्हे तर अवघ विश्वच जगण्यासाठी सुंदर
व्हावं यासाठी अनेकांची चाललेली धडपड
निश्चित एक आश्वासक विश्वास निर्माण
करणारी ठरते व प्रत्येक वर्षी जीवनाकडे
बघण्याचा आमचा दृष्टिकोन थोडासा
प्रगल्भ, बराचसा व्यापक आणि खूपच
सकारात्मक बनवणारा, पुढील वर्षभर
चांगलं काम करण्याची प्रचंड ऊर्जा
प्रत्येक 'वेध' मधून बाहेर पडताना
आमच्या गाठीशी असते.
विद्यार्थी-पालक-शिक्षक व इतर अनेक
व्यावसायिक क्षेत्रात वावरताना
वावरताना किंवा नव्याने प्रवेश करतांना
आवश्यक असलेला एक खोल व्यापक
दृष्टिकोन निर्माण करून त्यांचा एक
निश्चित वैचारिक दृष्टिकोन देणारी,
समाजातील लोप पावत चाललेली मानवी
मूल्ये टिकवण्याची व जोपासण्याची
म्हणजेच "value system" बांधणारी व
पुढच्या पिढी समोर असे आदर्श ठेवणारी
कि ज्यामुळे त्यांना पुढील आयुष्य
जगताना प्रचंड ऊर्जा, प्रोत्साहन व
सकारात्मकता मिळेल अशी चळवळ असे आजच्या
'वेध'चे स्वरूप झाले आहे.
वेधच्या निमित्ताने अनेक माजी
विद्यार्थी, पालक, हे सुद्धा सतत
क्लासच्या संपर्कात येतात. दरवर्षी
ऑक्टोबरपासूनच वेधबद्दल त्यांची
विचारणा चालू होते. प्रत्येक वर्षी
वेढमध्ये सहभागी होताना काहीतरी वेगळे
करावे असे विदयार्थी, शिक्षक, व
संचालक यांचे मत असते. यातूनच सायकल
वारी, ज्ञान दिंडी, पायीवारी आणि
स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जयंती
निमित्त असे प्रदर्शन असे विविध
उपक्रम राबवले.
|