|
आय.पी.अेच्.
संस्थेचं ब्रीद आहे ‘सुदृढ मन सर्वांसाठी’ |
आय.पी.अेच्. ही व्यावसायिक सेवा देणारी वैद्यकीय संस्था नसून,
मानसिक आरोग्याच्या संदर्भातली भारतातील पहिली स्वयंसेवी चळवळ
आहे. या चळवळीचा पाया १९९० साली डॉ आनंद नाडकर्णी,
डॉ. शुभा थत्ते आणि अन्य सहकाऱ्यांनी ठाण्यामध्ये रचला. मानसिक
आरोग्याच्या क्षेत्रात मानसिक आजारांचा उपचार आणि पुनर्वसन,
मानसिक ताणतणावांच प्रभावी शास्त्रीय मार्गदर्शन आणि मानसिक
शक्तींचा विकास साधणारं ठोस मार्गदर्शन या तीन गोष्टींसाठी
संघटितपणे काम करणे ही काळाची गरज आहे, हे ओळखून या
सूत्रांभोवती डॉ नाडकर्णीनी अनेक सेवाभावी कार्यकर्त्यासमवेत
ही चळवळ बांधली आहे.
मानसिक आजार व उपचार अथवा मानसिक आरोग्य असे शब्द उच्चारले की
समाज व मानसिक उपचार घेणारे यांमधे एक दरी असते. पण
स्वयंसेवकांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवून समाजातील ही दरी
कमीत कमी करणारी आय.पी.अेच्. सारखी स्वयंसेवी संस्था संपूर्ण
भारतात नाही. आय.पी.अेच्.चे कार्यकर्ते जनजागरण मोहिमेचे
नेतृत्व करतात. अनेकविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मानसिक
आरोग्य व समाज यांच्यामधील पूल बांधण्याचे व तो मजबूत करण्याचे
काम आय.पी.अेच्.च्या अनेक उपक्रमांनी केले आहे. त्यातील एक
प्रमुख उपक्रम आहे ‘वेध’.
वेध (Vocational Education Direction and Harmony) हा व्यवसाय
मार्गदर्शन परिषद म्हणून चालू झालेला आय.पी.अेच्.चा उपक्रम आता
पंचविशीच्या उंबरठयावर येऊन ठेपलाय. वेधचा आणखी एक अर्थ म्हणजे
मोती, माणिक इत्यादी रत्नांना छिद्र करण्याची क्रिया! ही क्रिया
योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने झाली तरच तो मोती अगर माणिक एका
धाग्यात गुंफून त्याचा आकर्षक हार बनविता येतो. वेध परिषदेच्या
व्यासपीठावर विविध व्यावसायिक क्षेत्रातल्या अग्रगण्य
व्यक्तींना आमंत्रित करून आपल्या जीवनाचे श्रेयस् आणि प्रेयस्
गवसल्याने यांचे योग्य छिद्र, योग्य ठिकाणी योग्य वेळी पाडले
गेल्याने अत्यंत सुंदर सर ओवले गेलेले आहेत. हे व्यासपीठ
व्यवसायाची निवड कशी करावी ह्या टप्यावर सुरु झाले आणि योग्य
मार्गक्रमणामुळे आजच्या तारुण्याच्या उंबरठयावर कसे जगायचे हे
सांगणारे व्यासपीठ बनले आहे. म्हणून ठाण्यापासून सुरु झालेल्या
या उपक्रमाचा विस्तार आज महाराष्ट्रातल्या पुणे, नाशिक,
औरंगाबाद, लातूर, अहमदनगर, कल्याण, परभणी, कोल्हापूर, पेण
यांसारख्या विविध शहरांत झाला आहे.
उत्तम पॅकेजिंग आणि सशक्त आशय यांची
सांगड नेटकी असेल तर काय जादू घडते याचं वेध हे मूर्तिमंत
उदाहरण आहे. वेधचा आणखी एक अर्थ चित्ताकर्षणपणा! तो तुम्हाला
या उपक्रमात नेहमीच अनुभवायला मिळेल. आज पंचवीस वर्षांनंतरही
काळ बदलला, पिढया बदलल्या पण वेध मात्र आपलं आकर्षण कायम ठेऊन
आहे. वेधच्या सूत्रात वेधचे यश आहे. छिद्र पडलेल्या मोत्याला,
माणकांना एकत्र गुंफून त्याचा सुंदर आकर्षक हर बनविण्यासाठी
धागा लागतो. त्याचप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाला सूत्र आले. (सूत्र
म्हणजेच सूत, धागा, तंतू) तर आपले विचार आपल्याला प्रभावीपणे व
नेमकेपणाने मांडता येतात. १९९५ पासून वेधची रचना एका
सूत्रापासून होऊ लागली म्हणूनच ही परिषद आता करियर कॉन्फरन्स
कडून करियर पर्स्पेक्टीव्ह्ज् कॉन्फरन्स कडे जायला लागली आहे.
ज्यांच्या विचारांचा प्रभाव अनेक वर्ष टिकतो ती खरी
कर्तृत्ववान माणसे. या माणसांविषयी अनेक जणांच्या मनात कृतज्ञता
असते. अशी एक नाही तर अनेक माणसं वेधच्या व्यासपीठावरून आज गेली
पंचवीस वर्ष लोकांना एका सूत्राच्या छत्रीखाली भेटत आहेत.
म्हणूनच वेध नावाचे संस्कारपीठ आज महाराष्ट्रभर विस्तारले आहे.
आत्मज्ञान ही ब्रह्मज्ञानाची पहिली पायरी आहे. त्या
पायरीपर्यंत पोचवण्याचं काम वेध परिषद करते.
|
|